लेखाजोखा - स्वरचित लेख संग्रह

ठप्प...चहाचे दोन ग्लास ठेऊन रामा निघून गेला. रामा आमच्या College चा Canteen वाला. चहा बनवण्यात पटाईत. मी त्याच Regular गिऱ्हाईक होतो त्यामुळे मी एकटा असून सुद्धा दोन ग्लास चहा का मागवतो हे त्याला माहिती असावं. खरंतर दोन ग्लास समोर ठेऊन एक एक करून पिणे ही माझी जुनी खोड. आमचे आजोबा म्हणायचे चहा कधीही एकटा प्यायचा नाही. कधी समोरच्या माणसाला तर कधी समोरच्या आपल्या वाट्याला आलेल्या शांततेला सोबती बनवून प्यायचा. मग तो चहा नक्कीच जिभेवर रेंगाळतो. एव्हाना मी एक ग्लास संपवून दुसऱ्याला तोंड लावत होतो. स्वतःच्या आयुष्याबद्दल फार विचार न करणारा मी आज मात्र चहाबद्दल भरपूर विचार करत बसलो होतो. कधीतरी कानावरून गेलेलं एक वाक्य याक्षणी आठवलं. “कॉफी म्हणजे प्रेम आणि चहा म्हणजे आयुष्य...” खरंच चहा म्हणजे आयुष्यचं नाही का...? निर्मळ पाण्यासारख्या आयुष्यात कधी कडू चहापावडर पडते मग त्याला गोडवा येण्यासाठी साखर टाकावी लागते आणि मग आपण नुसतच पाण्यासारखं जगलो नाही एवढ चारचौघात दिसावं आणि आपला काळपटपणा दूर व्हावा म्हणून दुधाने त्याला मस्त रंग आणावा लागतो. कितीतरी कौतुक करून घेतलंय या चहाने स्वतःच. काहींनी तर समुद्रमंथनातून निघालेल्या १४ रत्नांमध्ये त्याची गणना केलीये. १३ रत्नांनंतर समुद्रमंथनातून बाहेर आलेलं चौदावं रत्न म्हणून. असो , वेळ बदलली...काळ सरला पण चहा मात्र चहा च राहिला. हा नाही म्हणायला त्याला ही Green Tea , Lemon Tea सारख्या सवती आल्याच की. पूर्वीच्या काळी म्हणे ब्रिटीश खलाशांनी समुद्रात चहाच्या पेट्या टाकून उठाव केला होता ती घटना Boston Tea Party म्हणून ओळखली गेली. तेव्हापासून चहा ची ओळख जगाला झाली. बघता बघता चहा लोकप्रिय झाला. तरुणांपासून आबालवृद्धांना चहाने भुरळ घातली. बरीच काम करतो हा चहा...कधी प्रियकर प्रेयसी च्या भांडणाचा शेवट , कधी गोड मैत्रीची सुरुवात तर कधी जुन्या नात्यांना नवसंजीवनी देणं. चहाचं काम फक्त नाती जोडणं एवढच आता उरलेलं नाही तर सरकारी कचेऱ्यांमध्येही हा लोकप्रिय झालाय. म्हणूनच की काय बरेच कर्मचारी “आमच्या चहापाण्याचं काय ...? ” असा प्रश्न विचारतात. गल्ली ते दिल्ली आपल्यात सामावून घेणारा हा चहा सगळीकडे फक्त दहा रुपये खर्चून मिळतो याचं मात्र कौतुक वाटतं. आम्हा नाट्यकलाकारांना तर चहा म्हणजे जीव की प्राण. नवीन नाटकांचे प्रयोग , त्यांच्या संहिता आणि बाकीच्या चर्चा चहा घेतानाच तर होतात. पुण्यात अमृततुल्य मानला गेलेला चहा काहींना मात्र रुचत आणि पचत नाही. चहात असलेलं Caffeine म्हणे व्यसनाची सवय लावतं. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच मग तो चहा असो किंवा आणखीन काही. बघा बोलता बोलता दुसरा ग्लास सुद्धा रिकामा झाला पण नाटकाच्या तालमीची मुलं काही अजून आली नाही. मी म्हटलो ना आपल्या एकांतात आपली सोबत करणारा चहाच असतो. नाहीतर गेला अर्धा तास वाट बघायला माझ्यासोबत स्वर्गातली अप्सरा थोडीच येणार होती. बरं आली तर चांगलच आहे पण ती येईपर्यंत रामाला अजून एक कटींग आणायला सांगितलं पाहिजे असो आज आज जागतिक चहा दिवस असल्याचे msgs फिरत आहेत...अर्रे हो तुम्हाला सुद्धा जागतिक चहा दिनाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा बरं का...

-लेखक  रुपेश वाणी

यंदा भाद्रपदातल्या तृतीयेला अवकाशातून दोन तेजोतारका पृथीवरती अवतरल्या. त्यातली एक तेजोमय तारका होती श्रीगणेशाची तर दुसरी प्रकाशमान असणारी होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची. यंदा मुद्दामच बाप्पा लोकमान्यांना त्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव बघायला घेऊन आले होते. पुण्यातल्या केसरी वाड्यावर रात्रीचा मुक्काम करून भल्या पहाटे बाप्पा पार्थिव मूर्तींमध्ये तर टिळक जनसामान्यात मिसळले. चतुर्थिपासूनचे तीन दिवस यथासांग पार पडले आणि चवथ्या दिवशी मात्र टिळकांना गणेशाने आपल्याला भूलोकी का आणलं या कोड्याचं उत्तर मिळालं. टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे पहिले तीन दिवस अनेकांकडे अथर्वशीर्ष पठण आणि आरत्या झाल्या. चवथ्या दिवसापासून मात्र मुन्नी बदनाम आणि शीला ची जवानी ने आसमंत दणाणून गेला. कुणाला आमदार झाल्यासारखं वाटलं. तर कुठे शांताबाई येऊन गेल्या. हा सर्व प्रकार याची देही याची डोळा पाहणाऱ्या टिळकांना अखेर गणेशाची व्यथा समजली आणि आपण सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची हि अशी वाटचाल सहन न होऊन त्यांनी भूलोकावरून काढता पाय घेतला. असो...यातला विनोदाचा भाग सोडला तर आजचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने टिळकांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे साजरा होतोय का याचा विचार होणं फार गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर एकमेव मराठी माणूसच उत्सवप्रिय आहे...अशी खुद्द मराठी माणसाचीच धारणा आहे...अगदी सनातन काळापासून घराच्या कोनाड्यात साजरा होणारा गणेशोत्सव टिळकांनी चव्हाट्यावर आणला तो केवळ मराठी माणसांसाठी नाही तर अखिल हिंदुप्रजाजनांत एकसंघतेचं स्फुल्लिंग फुंकण्यासाठी. अर्थातच त्यावेळची परिस्थिती यासर्वाला कारणीभूत असणार हे नक्की. पण आज गणेशोत्सवाची संकल्पना पार बदलून गेलीय. ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांनी एकत्र याव आणि संघटीत व्हावं म्हणून लालबाग , दादर , चिंचपोकळी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. सुरुवातीला केवळ मराठी माणसाचा असणारा हा उत्सव नंतर मात्र इतर समुदायांनी मोठ्या भक्तिभावाने स्वीकारला. नवसांचे राजे तयार होऊ लागले आणि आपला गणपती उत्कृष्ट कसा होईल हि इर्षा प्रत्येकाच्या मनात घर करू लागली. मग सिनेसृष्टीतल्या नट-नट्यांना बोलाव, पडद्यावरील चित्रपटांच आयोजन कर हे प्रकार सुरु होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाने एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पाउल ठेवलं. २००१ ते २०१२ चा टप्पा गणेशोत्सवासाठी फार उपयुक्त ठरला. यादरम्यान अनेक सिनेमांमध्ये बाप्पा झळकले आणि त्यांच्यावर गाणी लिहिली गेली. श्रींचं पार्थिव रुप आणखीन १७-१८ फुटांनी विस्तारलं आणि आजवर श्रद्धा आणि भक्तीने श्रींसमोर नतमस्तक होणारे भक्तगण मान वर करून मंगलमुर्तींच लोभस रूप डोळ्यात साठवू लागले. सामाजिक संदेश देणारे देखावे पहायला जनसागर गर्दी करू लागला. आणि देखाव्यांच समाजप्रबोधन कमी कि काय म्हणून ठिकठिकाणी रक्तदान शिबीरं , नेत्रतपासणी शिबीर आणि आणखीन बऱ्याच गोष्टींची आयोजनं करण्यात येऊ लागली. अशाप्रकारे लोकमान्यांच्या संकल्पनेशी सुसंगती साधत आमचा गणेशोत्सव मानाचा गणेशोत्सव ठरला . ज्या पुण्यातून या सर्वाची सुरुवात झाली त्या पुण्याने गणेशोत्सवाचं पावित्र्य खऱ्या अर्थाने जपलं. पण २०१५ उजाडल आणि गणेशोत्सवाच स्वरूप पालटायला सुरुवात झाली. स्वतंत्र गल्लीचे स्वतंत्र राजे निर्माण होऊ लागले. नवसाला पावणारे नवीन बाप्पा बाजारात आले.ज्या पुण्यातून गणेशोत्सवाचा पाया रचला गेला त्यां पुण्यात मानाचे गणपती तयार झाले. आणि आजवर केवळ चाळीचा असणारा गणेशोत्सव मित्र मंडळांमध्ये विभागला गेला. पुन्हा एकमेकांच्यात स्पर्धा आणि गणेशोत्सवाचं स्वरूप पालटलं. रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत असं ज्या गणेशाच वर्णन वेदांमध्ये केलंय त्याची स्तुती करणाऱ्या गाण्यांचा तुटवडा भासू लागला आणि शुर्पकर्ण म्हणजेच सुपासारखे भले मोठे कान असणाऱ्या बाप्पाचे कान दुभंगेपर्यंत मंडळांमध्ये फिल्मी गाणी वाजवली जाऊ लागली. थोडक्यात काय तर गणेशोत्सवात ध्वनिप्रदुषणाचा श्रीगणेशा झाला. बाप्पाला निरोप देताना पाणावणारे डोळे अश्रूंनी नाही तर मोटारींच्या धुरामुळे ओले होऊ लागले. आणि अखेर जुन्या पिढीला सध्याचा गणेशोत्सव परका वाटू लागला.विसर्जनाला जमणारी भक्तमंडळी म्हणजे गर्दी वाटू लागली. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बाप्पांच्या पार्थिव मूर्तींचे अवशेष समुद्र्किनारचा कचरा वाटू लागला. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी टिळक स्वतःहून भूलोक सोडून गेले आणि मागे ठेऊन गेले, दहा दिवस हा सर्व प्रकार आपल्या बारीक डोळ्यांनी पाहणाऱ्या आणि हे सर्व सहन करून भक्तांवर आशीर्वादाचा वरदहस्त ठेवणाऱ्याs गणोबाला. म्हणूनच यंदा कैलासावर जातांना बाप्पा भरपूर प्रश्न मागे ठेऊन गेलेत. आपण जर त्या प्रश्नांची उकल करू शकलो तरच मंगलमुर्ती मोरया...पुढच्यावर्षी लवकर या असं म्हणायचा आपल्याला अधिकार आहे.

-लेखक  रुपेश वाणी

“आणि तुझ्याबरोबर मलाही...” अपूर्वा च वाक्य संपलं आणि तेरा सेकंदांमध्ये पडदा पडला...नेपथ्याची आवराआवर सुरु असतानाच माझ्या डोळ्यांसमोर आजवर घडलेल्या घटनांची एक निराळी एकांकिका साकार होऊ लागली...साधारण तीन महिन्यांपूर्वी दोन Super Seniors , चार Seniors आणि आम्ही दहा Juniors नी पाहिलेली यंदाचा पुरुषोत्तम करंडक २०१९ IMCC Institute मध्ये मानाने घेऊन येण्याच्या स्वप्नाची एकांकिका...हे स्वप्न म्हणजे कुणा एकाची मक्तेदारी कधीच नव्हती...आम्ही सर्व आपापल्या परीने पुरुषोत्तमरुपी नाट्यदेवतेला मढवत होतो...रंगमचावर असणारे पंचधातू...म्हणजे अपूर्वा घारे , मी ,सायली हिवरेकर ,राजदीप कुंभार आणि अभिजित सावंत तसचं रंगमंचाच्या मागे असणारे नऊ नवरत्न...मयूर काळे , गौरव कुलकर्णी , गौरव धारस्कर ,धनेश्वर टेकाळे ,विराज परघाणे, क्षितीज पांडे, विक्की कापुरे, कौस्तुभ दलाल आणि परिमल शेटे...कारण नुसतेच धातू दागिन्याची शोभा वाढवत नाहीत...तर त्यासाठी धातूच्या कोंदणात असावं लागतं ते अमुल्य रत्न...आणि हे दागिने घडवण्यात महत्वाची भूमिका होती ती दोन कुशल कारागिरांची...अक्षय मोरलवार आणि नरेश बोरसे यांची...तसचं हे दागिने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवले जात होते त्या दोन व्यक्ती म्हणजे प्राध्यापिका सौ. मीनाक्षी मोरे आणि सुविख्यात दिग्दर्शक श्री. अक्षय दत्त सर... हा प्रवास सुरु झाला १६ मे २०१९ ला...सुरुवातीला पुरुषोत्तमाला आपण काय देऊ शकतो याचा विचार झाला आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वत:हून स्वीकारली...मयूर काळे प्रकाशयोजनेत तर गौरव कुलकर्णी ध्वनी व्यवस्थेत दाखल झाले...अखेर संहिता ठरली आणि पात्रनिवड होऊन मे च्या शेवटच्या आठवड्यात सराव सुरु झाला. सुदैवाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सभागृह संस्थेने तालमींना उपलब्ध करून दिलं आणि अक्षय दत्त सरांच्या देखरेखीखाली आम्ही जोमाने तयारीला लागलो.अंतिम प्रयोगाला तीन दिवस बाकी असताना नेपथ्यात अमुलाग्र बदल करायचं ठरलं आणि मग खरा कस लागला तो रंगमंचामागच्या कलाकारांचा...ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्ठपणे हाताळली. २० ऑगस्ट ची सायंकाळ पुढ्यात येऊन ठेपली. भरत नाट्य मंदिराच्या त्या Makeup Room मध्ये आम्हा १३ जणांची Team प्रचंड दडपणाखाली बसली होती. वर रंगमंचावर सादर होणाऱ्या एकांकिकांचे आवाज चेहेऱ्यावरची उत्सुकता वाढवत होते. अखेर आम्हाला वर बोलावण्यात आलं आणि उराशी बाळगलेलं ते ६० मिनिटांच चक्र सुरु झालं. ती ६० मिनिटे बघता बघता सरली आणि आम्ही सज्ज झालो बाहेर उभ्या असलेल्या आमच्या आप्तांचं कौतुक स्विकारण्यासाठी. दुसऱ्या दिवशी पावलं सरळ वर्गाकडे न जाता G1 कडे वळली. जेव्हा सारे पुन्हा भेटलो तेव्हा आतापर्यंत नाटकाला आपण काय देऊ शकतो हा विचार करणारा मी आता मात्र नाटकाने आपल्याला काय दिलं याचा विचार करू लागलो. बरंच काही दिलं नाटकाने. व पु काळे म्हणतात “ माणसाचं आयुष्य मोजावं ते त्याने जोडलेल्या माणसांची आणि त्याने प्राप्त केलेल्या आचार विचारांची मोजदाद करून. ” १३ अनोखी माणसं नाटकाच्या निमित्ताने जोडण्यात मला यश आलं. नियमांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारा राजदीप , प्रसंगाचं कमालीचं भान असणारा अभिजित , नकारात्मकतेच्या पल्याड असणारी अपूर्वा , वक्तशीरपणा अंगी बाणलेला नरेश आणि हो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघणारा अक्षय. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांचं पुस्तक उघडं करून बसलेला. कुणीही यावं आणि हवं ते वाचावं अशी वयाचं भान नसणारी ही माणसं. ही यादी इथचं संपत नाही तर Organized आणि टापटीप असणारी माझी सहकलाकार सायली , दिलेलं काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारे आमचे तांत्रिक सहकारी गौरव आणि मयूर यांची ही त्यात भर आहेच. पदोपदी आपल्या अमुल्य टिप्पणीने रंगमंचावरच्या भूमिका समृद्ध करणारी आमचे नेपथ्य सांभाळणारे नऊ कलाकार यांच्या उल्लेखाशिवाय ही यादी अपूर्ण आहे. यातल्या प्रत्येकात स्वतःच असं एक वेगळेपण होतं जे त्यांनी शेवटपर्यंत पुरुषोत्तमाला देऊ केलं. एव्हाना नेपथ्य आवरून आम्ही रंगमंच रिता केला होता. इतक्यात दिग्दर्शक म्हणून सही करण्यासाठी कलोपासकांनी दिलेल्या हाकेने मी भानावर आलो. ४९.५३ मिनिटात आम्ही आमचं नाटक पूर्ण करून सज्ज झालो होतो बाहेर उभ्या असलेल्या आमच्या प्राध्यापक वर्गाचं , मित्र-मैत्रिणींचं आणि आप्तांच कौतुक स्वीकारण्यासाठी. त्यांच्या कौतुकात पुरुषोत्तम २०१९ चा आमचा प्रयोग आटोपला. असो , शेवटाकडे जाताना संकर्षण कऱ्हाडेंच्या ओळींचा उल्लेख करतो आणि थांबतो... “कुछ देर की खामोशी है फिर शोर आयेगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर आयेगा”

-लेखक  रुपेश वाणी