गुजगोष्टी - स्वरचित कथा संग्रह

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मुर्ती... कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आंत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, " थांबा जरा ..गणपती मुर्ती आहे....!" त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मुर्तीकडं पाहिलं. ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हांत नकळत जोडले गेले. कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला...! काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मुर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्याची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, "राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मुर्ती ठेऊ. तेव्हा द्या." थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, "काका एक विचारु? तुमच्या गावात गणेशमुर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी. च्या प्रवासाची दगदग करुन? " सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, "आमच्या गांवात मिळतात मुर्त्या. पण अशी नाही. ही मुर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!" कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हांत जोडले. हलकेच स्पर्शही केला. " आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मुर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही... तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले "माझं बाळ...! " हे असं घडल्यापासून. ह्या गांवातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो " कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं " पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावांत .." " ते ही केलं पण... जास्त मुर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच शाश्वती नाही " हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, "काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!" सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले,"विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय..... विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. " यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गांव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मुर्ती हातात घेतली, म्हणाला "काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी.." काहीजण त्या मुर्तीकडं जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदललेली....! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले "दिड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल " कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं " दिड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? " काकांनी स्मित केलं, "दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? " हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..! काका म्हणाले, "असे कोड्यात का पडलांत बरें? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मुर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही ... पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची.. आपल्या अलिंगनाची .. द्या दिड तिकिट..!' हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दिड तिकीट दिलं..! सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हांत जोडले गेले..... अगदी अनाहूतपणे .

-लेखक  पराग.

कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ' तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.' "माझं वय यावर्षी चाळीस होईल ... म्हणजे... अरे बापरे! आईची ही साठी! " तिने लगेच वहिनीला फोन लावला," वहिनी अगं, आईचा साठावा वाढदिवस आहे यंदा. आपण तो छान साजरा करू. मी येते चार दिवसांची सुट्टी घेऊन.... नाहीतरी येणं झालंच नाही या उन्हाळ्यात! आल्यावर प्लॅनिंग करू.... " मेधा माहेरी पोहोचली. तिला असे अचानक आलेले बघून मंगलाताईंना म्हणजे तिच्या आईला खूप आनंद झाला. " किती दिवसांनी आली गं, आईची आठवण येत नाही ना आता! " " तसं नाही गं आई, ऑफिस , घर त्यात आता मुले मोठी झालीत त्यांच्या वेळा, क्लास, अभ्यास या सगळ्यात गुरफटून गेले गं मी! इच्छा असूनही येता येत नाही. म्हणुन आता आले बघ..." मंगलाताईंनी त्या दिवशी लेकीचे आवडते बिरडे भात केला. तिला पोटभरून ते खाताना बघून त्यांच मन भरून गेलं. रात्री मेधाचं अंथरून त्यांनी त्यांच्या खोलीत टाकलं....खूप गप्पा मारायच्या होत्या किती दिवसांच्या साचलेल्या! पण बराच वेळ झाला तरी ती खोलीत आली नाही.. म्हणुन त्या बाहेर आल्या. इकडे सगळे मिळून आईच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करत होते. "केक बाहेरून ऑर्डर करू.... " " डेकोरेशनचं मुले सांभाळतील, साठ दिवे आहेत का वहिनी.. नाहीतर आणावे लागतील." " पण मेधाताई , जेवायला काय बनवायचं? आईंच्या आवडीचं काही तरी सांगा ना! " " आईला काय आवडतं मला नाही आठवत बाई! वहिनी तुला माहीत नाही का?" " आई, तर कधीच काही म्हणाल्या नाही... जे बनवते ते, त्या आवडीने खातात.... पण काहीतरी असेलच ना.. ताई तुम्हाला तरी माहीत असायला हवं ना ? " आईला काय आवडतं कुणालाच सांगता येईना. " आत्या, आजीला गिफ्ट काय घ्यायचे? " तेही काही ठरेना? साडी घ्यायची, तर आईला कोणता रंग आवडतो हेच कोणाला माहित नव्हते. वस्तू तरी काय घ्यायची, आईला काय आवडतं.. हे कुणालाच समजेना. मंगलाताईंनी त्यांचे सारे बोलणे ऐकले. रूममध्ये येत त्या म्हणाल्या, " तुमचं बोलणं ऐकलं मी चुकून...... मला वाटलंच मेधा अशी अचानक कशी आली." " आई, काय गं, आमचं सरप्राईज कळलं तुला. आता कळलंच आहे तर हेही सांग तुला काय आवडतं...तोच मेनू ठरवू आपण. गिफ्ट पण तुझ्या आवडीचं घेऊ. " मंगलाताई एकदम शांत झाल्या ...बराच वेळ आपल्याच विचारात त्या हरवल्या. " मला काय आवडतं? इतक्या वर्षात पहिल्यांदाच हा प्रश्न माझ्यासमोर आलाय. त्यामुळे एकदम काही आठवतच नाही. मला खायला काय आवडतं हे मी विसरूनच गेले आहे. लग्न झाल्यावर कुटुंबातील मोठ्या माणसांच्या आवडीनिवडी जपल्या , नंतर तुमच्या बाबांच्या, तुम्ही आल्यावर तुमच्या, आता नातवंडांच्या.... सगळ्यांच्या आवडी त्याच माझ्या आवडी बनून गेल्या... . हो पण लग्नाआधी माझी आई बनवायची ना माझ्या आवडीचं. ती माझ्यासाठी मी म्हणेल तेव्हा लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवायची... अहा! ती चव, तो सुगंध अजूनही मनातून गेला नाही. " " पण आई, मी या घरात आल्यापासून तर तुम्ही घाऱ्या बनवल्याचे मला आठवत नाही. " " हो आई, मीही कधी आपल्या घरात हा पदार्थ बनवलेला पाहिला नाही. " " माझे नुकतेच लग्न झाले होते... मी आपल्या गावालाच होते सुरुवातीला. तुझे बाबा नोकरीच्या ठिकाणी असायचे.. सुट्टीच्या दिवशी यायचे. एके दिवशी शेतातून ताजा लाल भोपाळा आला. सासुबाई शेतात होत्या . मला घारे खाण्याची खूप इच्छा झाली. मी ते बनवले. दुपारच्या जेवणात सगळ्यांची वाट पहात बसले होते... पण माझ्याने राहवेना. घाऱ्यांचा तो मधुर सुवास! माझ्या तोंडाला पाणी सुटले... मी लगेच एक पुरी तोंडात घातली... तेव्हड्यात सासुबाई आल्या. " लाज कशी वाटत नाही तुला? नवरा नसताना गोडधोड करून एकटीच खात बसली... घश्याच्या खाली कसं उतरतं तुझ्या? तिकडे माझा बाळ, खानावळीचं बेचव जेवतोय, आणि तू चांगलं तळून-मळून गोडाचं खाते... आणि कुणी तुला हे बनवायला सांगितलं होतं? आपल्या घरात घारे कुणी खात नाही. परत न विचारता काही करायचे नाही." " तोंडातला घास तोंडातच राहिला, परत कधी मी घारे बनवले नाही आणि खाल्लेही नाही... भरलेली टोपली तशीच गड्याला देऊन टाकली. आज तुमचा प्रश्न ऐकून ते घारे डोळ्यापुढे आले. आणि आठवलं मला ते फार आवडायचे. " हे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. " पण आई, तुम्ही इतक्या वर्षात एकदाही तुमच्या या आवडीच्या पदार्थाविषयी बोलला नाहीत.... बनवले असते ना मी. " " कुणी कधी विचारले नाही म्हणून मीही सांगितले नाही. अगं, घरातल्या बाईला काही आवडीनिवडी असतात हे घरातले विसरूनच गेलेले असतात... सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक घरातल्यांना विचारल्याशिवाय होत नव्हता... तुझ्या बाबांच्याही काही कमी आवडीनिवडी नव्हत्या. त्यांना खूप तिखट चमचमीत भाज्या लागायच्या.... मला सुरुवातीला त्या खाताच यायच्या नाही......चपातीबरोबर भाजी टोचून टोचून मी खायची.... पण स्वतःसाठी वेगळं काही बनवायची हिम्मत नव्हती. झाली सवय हळूहळू. घरात आंब्यांच्या राशी पडायच्या... रोज पातेले भरभरून आमरस बनवायचे. मुला-नातवंडांना सासुबाई चार-चार वाट्या आमरस प्यायला द्यायच्या. आम्हा बायकांच्या जेवणाच्या वेळी रस संपलेला असायचा. मी परत रस करायला घेतला तर त्या म्हणायचा, " आता कशाला करत बसतेस परत, इतकं काम पडलंय... घ्या आपल्याला आंबे अढीतून."..... आणि मग आम्ही सार्‍या दोन दोन आंबे खाऊन समाधान मानायचो. कमी नव्हती कशाची. पण आपल्यासाठी करायची ना हिम्मत होती, ना मला काही आवडतं हे म्हणायची ताकद! तीच सवय लागली गं....... आणि काही वर्षातच आपल्याला काय आवडते, हेच आपण विसरून जातो. जे आहे ते गोड मानायला लागतो. जी गोष्ट खाण्याची तीच इतर आवडीनिवडींचीही! कपड़े काय नि वस्तू काय.... जे मिळाले ते स्विकारले... छंदही असेच काळाआड गेले. आवडतं काय हे विसरूनच गेले. आज विषय निघालाच आहे तर तुम्हालाही सांगते. तुम्ही आपलं मन मारायचं नाही. तुझं लग्न झाल तेव्हाही मेधा मी तुला सांगितलं होतं आणि सूनबाई तुलाही.... तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करायचं... स्वतःसाठी उभं राहायच आणि स्वतःसाठी पण जगायचं. " " आई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. नेहमी मला म्हणत असता, तुला जे आवडेल ते बनव, तुला काय आवडतं ते घाल, मी नोकरी करू शकते तेही तुमच्यामुळे..... तुम्ही घर, मुले सांभाळता म्हणून माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी पुढे जात आहे...... आणि मी? कधी तुम्हाला तुमच्या आवडींबद्दल विचारलंच नाही... गृहीत धरून चालले.. किती स्वार्थी आहे मी! " " आणि आई मीसुद्धा... कधीही तुला काय हवंय, याचा विचार केला नाही. " " वेड्या का गं तुम्ही? अगं आवडींना मुरड घालत, प्रत्येक वेळी तडजोड करत राहिले, त्यामुळे स्वभावच असा झाला. माझ्या जगात बाकी सगळ्यांना जागा होती... पण एक छोटासा कोपरा त्या जगात माझ्या स्वतःसाठी ठेवायचे भान मला राहिले नाही. आता वयाची साठी पार करताना जाणवतेय स्वतःसाठी जगणं राहूनच गेलंय.... तुमच्या बाबतीत तरी असे होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होते. माझ्या सासुबाई माझ्या पाठीशी नव्हत्या, त्यांनी मला स्वत्व विसरायला लावलं ... कारण त्यांनाही तशीच वागणूक मिळाली होती...पिढ्यानपिढ्या हेच होतं आलंय... ही साखळी तोडायचा म्हणूनच मी प्रयत्न करत आहे.." " तुम्ही आमचा इतका विचार करता, आता आम्हीही तुमच्यासाठी ते सर्व करणार... " " नाही !तुम्ही माझ्यासाठी काही करायचं नाही ... या साठाव्या वाढदिवशी एका नव्या मंगलेचा जन्म होणार आहे. दुसर्‍याने आपल्यासाठी काही करावे, ही अपेक्षाच चूक आहे, हे मला आता कळलंय. मीच माझ्यासाठी उभी राहणार. माझ्या राहिलेल्या इच्छा आणि आवडी पूर्ण करणार. कालच मंदिरातल्या ग्रुप बरोबर बोलणं झालंय... या जडावलेल्या बोटांमधून लुप्त झालेली हार्मोनियमची सप्तकं मला खुणावत आहेत... माझी संध्याकाळ आता या सुरांसाठी.... शिवाय वर्षातून एकदा ग्रुपच्या सहली निघतात.. मीही जाणार.. पर्यटन करणार.... आणि सकाळचा वेळ चालायला जाण्यासाठी आणि प्राणायाम करण्यासाठी! सूनबाई आता या वेळेत मी तुमच्या वाट्याला येणार नाही...तो वेळ फक्त माझा. कराल ना मॅनेज सर्व. " " अगदी आनंदाने आई! " मंगलाताईंचा वाढदिवस अगदी आगळावेगळा ठरला.. जेवणात घारे तर होतेच पण अजूनही अनेक पक्वान्ने होती, जी खास मंगलाताईंच्या आवडीची होती. सगळ्यांंतर्फे नवीकोरी हार्मोनियम त्यांना भेट देण्यात आली. केक कापताना त्यांनी पाहिले, केकवर साठ अंकाच्या मेणबत्त्या होत्या . त्यांनी सहा हा आकडा केकवरून काढला. केक वर फक्त शून्य राहिला... शून्य, ज्यातून नव्याचा आरंभ होतो ! त्या शून्यातून सुरुवात होणार होती एका नव्या जगण्याची!

-लेखक  अर्चना बोरावके

बर्‍याच दिवसांनी आला होता तो आज, त्याच्या आईकडे. पुण्याहून मुंबईला येणं हल्लीच्या दिवसांत, हे एखाद्या फारेन कंट्रीहून येण्यासारखंच झालं होतं. पण तरीही तो आला होता... एकटाच. आतून अगदी खोलातून त्याला वाटलं होतं की, आईला ताबडतोब भेटायला हवं. मग वर्क from होम चं मानगुटीवरचं भुत... दोनेक दिवसांकरता उतरवून, त्याने मुंबई गाठली होती. आई अर्थातच खुश झाली होती प्रचंड, लेकाला जवळपास आठेक महिन्यांनी बघून. आणि लगोलग थोडीशी नाराजही झाली होती... सुन, नातवंडं नं आलेली पाहून. अर्थात ह्या अशा दिवसांत... लहानग्यांना घेऊन प्रवास शक्यतो टाळावाच, हे समजून घेतलं होतं आईने. तर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा, चौकशा, हालहवाल झाल्यावर... आई उठली स्वैपाक करायला. लेकाला आवडते म्हणून... डाळींबी भिजवून अगदी स्वतः सोलून ठेवली होती तिने, तिचीच उसळ करणार होती आई आज. जोडीला अर्थातच आमरसही होता. तो मस्त पहुडला होता, बेडरुमच्या खिडकीखाली असलेल्या पलंगावर. इथे पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर बघत बसणं, हा त्याचा छंद असे कोणे काळचा. त्यावेळी खिडकीतून तो दूरवरचा डोंगर दिसत असे... पण आता झालेल्या दोन - तीन बिल्डिंग्जमुळे, तो डोंगर पार अडला होता. पुर्वी सुर्योदय दिसणार्‍या ह्या खिडकीतून आता, थेट मध्यान्हीलाच त्याचं दर्शन घडत असे. आज डोक्यावरचा सुर्य पाहून हळहळला होता तो. तेवढ्यात मस्त हापुस आंब्याचा, सुवास दरवळला घरभर... आंबे पिळायला घेतले गेले होते म्हणजे. पाठोपाठ वाजलेल्या कुकरच्या शिट्टीने, शिजलेल्या डाळींबीचा गंध घरभर पसरवला. पोळीवाल्या काकूंनी तव्यावर उपडी केलेली पोळीही मग, मागे न राहता खरपूस घमघमून गेली. पाठोपाठ 'घर्रर्र' करुन वाजलेल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण... आईने उघडायचीच खोटी होती की, लसूण चटणीचा चटका आसमंतात दर्वळला. तोपर्यंत गॅसवरील पातेल्यातून उकळी फुटलेली आमटीही, हळूवारपणे येऊन नाकाशी हुळहुळली. त्याच्या मनात विचार आला की... "सुख म्हणजे आणिक काय असतं?". आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, समोरच्या भिंतीवरच फडफडणार्‍या मराठी कॅलेंडरकडे. पुर्णपणे कोरं - करकरीत दिसत होतं ते. त्याच्या आईला कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर, काही ना काही लिहायची सवय होती. त्याला आश्चर्य वाटलं की... "अरे हे असं इतकं रिकामं कसं?". ह्या विचारांतच त्याने उठून... ते कॅलेंडर हूकवरुन काढून हातात घेतलं, नी अगदी जानेवारीपर्यंत मागे गेला तो. पण एकाही तारखेवर, अगदी काहीही लिहिलेलं नव्हतं. तेवढ्यात त्याला दिसलं मागल्या वर्षाचं कॅलेंडरही, त्याच हूकवर टांगलेलं... ज्याच्या वरच हे नवं कॅलेंडर लावलेलं आईने. त्याने ते जुनं कॅलेंडरही काढलं, नी चाळू लागला तो. तर ते ही कोरच होतं. डिसेंबर, नोव्हेंबर, आॅक्टोबर असं एकेक महिना मागे जात जात... तो जुलैवर गेला नी थबकला. जुलै २०२० च्या १ ते १५ तारखा, आईच्या अक्षराने भरलेल्या होत्या. १ तारखेवर लिहिलेलं... 'ह्यांची अमूक एक गोळी सुरु, पुढील दोन महिन्यांकरीता'. ४ तारखेवर लिहिलं होतं... 'ह्यांच्यासाठी नवी छत्री नी पावसाळी बुट आणले'. ६ तारखेवर लिहिलेलं... 'ह्यांच्यासाठी कंबरदुखीच्या डाॅक्टरची अपाॅईंटमेन्ट घेतली ९ तारखेची'. अशा त्या १ ते १५ तारखांपैकी... आठ - नऊ तारखांवर आईने लिहिलं होतं, पण फक्त त्याच्या बाबांबद्दल. त्याने मागे जात आणिक दहा - बारा तारखा चेक केल्या वेगवेगळ्या महिन्यांच्या, तर त्यांवरही बाबांबद्दलच काही ना काही लिहिलेलं दिसलं त्याला आईने. तो पुन्हा जुलै महिन्यावर आला... आणि त्याने १४ तारीख पाहिली, तर ती वर लिहिलं होतं... 'ह्यांच्या जिभेची चव गेली आज'. लगेच त्याने १५ तारीख बघितली, जी शेवटची तारीख होती काहीतरी लिहिलेली. आणि त्यावर आईने लिहिलेलं... 'आज ह्यांना कुठलाच वासही येईनासा झाला'. मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत... म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होता, एक मोठ्ठा काळा टिंब... अर्थातच FullStop "म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं?... तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे?... इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच?" ह्या विचारांनीच गलबलून आलं त्याला. पण त्याने आईकडे मात्र, काहीच विषय काढला नाही ह्या बाबत. दुपारचं आईच्या हातचं मनसोक्त जेवण करुन, तिच्या हातून काही घास भरवून घेऊन... तो तृप्त होऊन झोपी गेला. संध्याकाळी पाचच्या सुमारास, चहाच्या आधणाच्या वासानेच त्याला जाग आली. आणि पुन्हा त्याला ती मागल्या वर्षीची... १५ जुलै तारीख आठवली, नी आठवलं आईने लिहिलेलं... 'आज ह्यांना वासही येईनासा झाला'. त्याला पुन्हा कसंनूसं झालं, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं कॅलेंडरकडे आजच्या तारखेवर. तो चमकलाच... घाईत पलंगावरुन उतरत, तो भिंतीशी गेला. आणि त्याला दिसलं... त्याच्या आईने लिहिलेलं काहीतरी, आजच्या तारखेवर... 'आज लेकाला हातचं करुन जेऊ घातलं... अचानक पुन्हा जगावसं वाटू लागलं'. हे वाचलं मात्र... एक हुंदका त्याला न जुमानता, जोराने बाहेर निघालाच. आजच्या तारखेवरुन हळूवार बोट फिरवत राहिला तो. तेवढ्यात आईचा आवाज आला स्वैपाकघरातून... "चहा झालाय रे... जागा झालास का?". तो रडतच ओरडून म्हणाला... "हो... आजच, अगदी आत्ताच जागा झालोय". उपड्या हातांनी दोन्ही डोळे पुसत उठला तो जागचा, मनोमन निर्धार करुनच की... "आता ह्यापुढे आईला आणि कॅलेंडरातील ह्या तारखांनाही, कधी एकटं पडू द्यायचं नाही".

-लेखक  सचिन देशपांडे

रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं, आधीच सकाळपासुन वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली. रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबावं लागलं नव्हतं. ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला. पत्र्याच्या शेड खाली….छोटीशी चहाची टपरी होती. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातवरणही छान होतं, हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता. टपरीवर एक जोडपं आणि छोटं मुल होतं. ते मुल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसुन बघत होते. त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला.एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला. त्याचं त्यालाच छान वाटलं. समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर...चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला...बायकोचाच त्याने कट केला सकाळपासुन हा पाचवा फोन तिचा काहितरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला. तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरिवाला समोर आला..आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला. ते मुल क्षणभर थबकलं पाणी खेळताना. तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू. आणि तो काचा भरू लागला. तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली. तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला. एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य. पण तो माणूस शांत होता. आता ह्याची बेचैनी अजून वाढली. ह्याला सकाळचा प्रसंग आठवला. आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती बोललो तिला पण ती शांत होती. ह्या वातावरणासरखी आणि आपण ह्या चहासारखं गरम. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातुन निघत होत्या. आपलं तर फारस नुकसानही नव्हतं. पण आपण किती रिएक्ट झालो..त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला. खुप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून. तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला. वीसची नोट देताच चहावाला म्हणाला " सर सुट्टे नाही माझ्याकडे 10 रु दयायला....तुमच्याकडे असतील तर बघा...त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे. “ चॉकलेट देऊ ” चहावाला म्हणाला त्यावर हसुन ह्याने नकार दिला.आणि म्हणाला. “ असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली.ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात. मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात. ” चहावाला हसुन म्हणाला."तिला दिसत नाही. तरी ती माझ्या कामात मदत करते. कधीतरी चूक होणारच. आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणार कोणी नसतं...आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी. आयुष्य क्षणभंगुर आहे होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं. आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि एकाएकी दृष्टी गेली. डॉकटर म्हणाले, “ येईल दृष्टी परत...पण कधी ते नक्की नाही ” खुप वाईट वाटलं. माझी चिडचिड होत होती...एकदिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली “ आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा.मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे. त्यादिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही. माणुस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर. थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं. ” ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं. अंध बायको असुन किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं. आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत. आपली बायको सकाळी किती घाबरली होती. त्याला आठवलं, खरंतर रात्रभर पाय दुखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती. तिला चार दिवसाच्या पाळीने अशक्तपणा येतो. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं. त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली “ दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या...कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही. तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका.कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारा म्हणजे मजा असते नाही का...? इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का...? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला. ” तो बघतच राहिला त्या जोडप्याला. एकमेकांना शारिरीक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणार जोडपं. आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होत आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती. हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं. त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खुप काही मिळालं ह्या भावनेने निघाला. गाडीला किक मारताना सहजच टपरिची पाटी बघितली. त्यावर नाव होतं “ सुखाचा चहा ”.

-लेखक  स्वप्ना मुळे